
तुम्ही एकटे नाही, सगळा शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कुणीही सुटणार नाही. हत्या कोणी केली हे शोधून काढण्यास भाग पाडू. गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुर्णेकर कुटुंबाला धीर दिला.
उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात येऊन प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते राजन विचारे, आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. माझ्या पतीच्या हत्येचे प्लॅनिंग करणाऱ्या मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंना आरोपी केले पाहिजे, त्यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे, मीनाक्षी शिंदे यांचे नगरसेवकपद रद्द केले पाहिजे. आम्हाला न्याय हवा, असा आक्रोश पुर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती यांनी यावेळी केला. आमचे कुटुंब प्रचंड दबावाखाली आहे. धमक्याही आल्या आहेत. आता घरात राहायलाही भीती वाटते. माझ्या वडिलांच्या हत्येची सुपारी देणारा मीनाक्षी शिंदेंचा नवरा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. आता आमचा स्थानिक पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून फास्ट ट्रक कोर्टात सुनावणी घेण्याची मागणी पुर्णेकर यांची मुलगी निशिता हिने केली.
आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामुळे मीनाक्षी शिंदे व पतीचा एफआयआरमध्ये उल्लेख
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे पुरवणी जबाबातून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली. पुर्णेकर यांचे जावई किरण डोंगरे यांनी ही घटना उद्धव ठाकरे यांच्याकडे आवर्जून नमूद केली. ते म्हणाले, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही पोलीस ठाण्यात आले. त्यांच्यामुळेच मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदे यांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला. आम्हाला मोठा आधार मिळाला.
भावनिक होऊन कोणतेही पाऊल उचलायचे नाही. ठाण्यात दडपशाही सुरू आहे. त्यांची दडपशाही किती दिवस चालणार? आता आपण त्याला उत्तर द्यायचं आहे!




























































