ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एकजूट, रविवारच्या शिवसेना-मनसेच्या जनमोर्चात काँग्रेस; राष्ट्रवादीही उतरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रविवारी 4 ऑगस्ट रोजी भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडास कंपनीचे प्रवेशद्वार ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत विराट जनमोर्चाची हाक शिवसेना आणि मनसेने दिली असून या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डावे पक्षही उतरणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मोर्चाची जोरात तयारी सुरू असून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक मुंबईत येणार असून ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची आणि निवडणूक आयोग बरखास्त करण्याची गर्जना या मोर्चाद्वारे महाराष्ट्रातून होईल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकशाही मानणारे रस्त्यावर उतरताहेत

लोकशाही मानणारे नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहेत. राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन हे जनआंदोलन व्हावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच रविवारच्या या जनमोर्चात काँग्रेस सहभागी होईल, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले.

सशक्त लोकशाहीसाठी हा लढा

सशक्त लोकशाहीसाठी हा लढा आहे. हा कोणत्या एका पक्षाचा लढा नाही. तिरंगा हाती घेऊन हे आंदोलन होणार आहे. मताचा अधिकार अडचणीत आला असून प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावर उतरले पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनात सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले.