
कल्याण-भिवंडी मार्गावरील गांधारी पुलावरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलावर जागोजागी खड्डे पडल्याने खड्डा चुकवताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले आहे. याठिकाणी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारला आहे. लवकरात लवकर पथदिव्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
गांधारी पूल हा कल्याण, भिवंडी तसेच बापगाव परिसराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. कल्याणहून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच कल्याण-भिवंडी बायपास मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक बापगावमार्गे भिवंडीला जातात. मात्र रात्रीच्या वेळी पुलावरील पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना अंधारातूनच प्रवास करावा लागत आहे. पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपुऱ्या प्रकाशामुळे हे खड्डे वाहनचालकांच्या वेळीच लक्षात येत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
गांधारी पुलावरील पथदिवे बंद असल्याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारी पुलावरील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, तसेच पुलावरील खड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पंडीत यांनी केली आहे.


























































