
निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या विरोधात आता संगमेश्वर तालुक्यातील जनता थेट रस्त्यावर उतरली आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी शुक्रवारी, 2 ऑक्टोबर रोजी (महात्मा गांधी जयंती) देवरूख येथे नागरिकांकडून जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
गांधी जयंतीचे औचित्य साधून सकाळी 11 वाजता देवरूख पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन छेडण्यात आले. निदर्शनांनंतर आंदोलकांनी तहसीलदार अमृता साबळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. ज्ञानेश कुमार यांना तातडीने पदावरून हटवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी. त्यांच्या कार्यकाळात कथित गैरमार्गाने पार पडलेल्या सर्व निवडणुका रद्द करून त्या ठिकाणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने पुन्हा मतदान घेण्यात यावे. निवडणूक प्रक्रियेतील कथित हस्तक्षेपास जबाबदार असलेल्या केंद्र सरकारला बडतर्फ करण्यात यावे.
या आंदोलनात परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने:युयुत्सु आर्ते, ॲड. लक्ष्मीकांत जाधव, बंड्या बोरूकर. निलेश भुवड नितीन लोकम, प्रदीप गुरव, विनय पानवळकर, शेखर जोगळे, अभिजित पाटील, संजय मोहिते, काशीनाथ वाजे, आदी उपस्थित होते.






























































