
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची ‘उद्याच’ बदली करण्याचा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता. मात्र, दोन दिवस झाले तरी अद्याप कोणतीही बदली झालेली नाही. यावरून मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पुन्हा एक ‘चॉकलेट’ दिले असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना पुन्हा एक ‘चॉकलेट’ मिळाले आहे. शेतकऱ्यांना गाजर देणं तर रोजच सुरू आहे, पण दोन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची ‘उद्याच’ बदली करण्याचा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता. पण दोन दिवस झाले तरी अद्यापही बदली करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना पुन्हा एक ‘चॉकलेट..’
शेतकऱ्यांना गाजर देणं तर रोजच सुरुच आहे पण दोन दिवसांपूर्वी #MPSC च्या विद्यार्थ्यांसोबत झालेल्या बैठकीत #MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांची ‘उद्याच’ बदली करण्याचा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता, पण दोन दिवस झाले तरी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 2, 2026
पुढे त्यांनी म्हटले की, जर अशी परिस्थिती असेल तर मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? त्यामुळे आता आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय अजिबात माघार घेणार नाही, असा स्पष्ट निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला आहे.


























































