मतं चोरणं म्हणजे लोकशाही चोरणं, ज्ञानेश कुमार यांच्यावर ‘आप’चा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार यादीतील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवरून आता आम आदमी पार्टीने (AAP) निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. “मतं चोरणं म्हणजे थेट लोकशाही चोरण्यासारखे आहे,” अशा शब्दांत आपचे नेते अनुराग धांडा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सध्या देशात मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदार यादीत फेरफार करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनुराग धांडा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष केले. “लोकशाहीत मतदान हा सर्वात मोठा अधिकार आहे आणि जर त्यातच चोरी होत असेल, तर ती थेट लोकशाहीचीच चोरी आहे,” असे धांडा म्हणाले आहेत.

दरम्यान, आज दिल्लीतील जंतरमंतरवर ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA), आरजेडीचे खासदार मनोज झा आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती.

मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी या निदर्शनांना परवानगी नाकारली. तसेच नवी दिल्ली आणि जंतरमंतर परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि निमलष्करी दलाच्या तब्बल ५,००० जवानांचा कडेकोट फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच परिसरातील सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते.