
परदेशी पाहुणे सीगल पक्षी दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले आहेत. सीगल पक्षांच्या आगमनाने समुद्र किनारे बहरुन गेले आहेत. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना येथील समुद्र किनारे आकर्षित करत आहेत. थंडीच्या दिवसात अन्नाच्या शोधात आणि पूरक वातावरणात राहण्याकरता हे पक्षी हिंदुस्थानात येतात.
दापोलीत थंडीला सुरूवात झाली आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे सीगल पक्षी (समुद्रपक्षी) मोठ्या प्रमाणात दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी दापोलीतील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले आडे पाडले आणि केळशी येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचीही गर्दी होत आहे.






























































