
>> रोहन भाटे
>> शब्दांकनः गोरख तावरे
जागतिक प्राणी दिन हा केवळ प्राण्यांप्रति प्रेम आणि करुणा व्यक्त करण्याचा दिवस नसून, वन्य जिवांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन आणि निसर्गाप्रति असलेली आपली सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्याची संधी आहे. 4 ऑक्टोबर रोजी साजरा होणारा जागतिक प्राणी दिन आणि 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणारा वन्यजीव सप्ताह यांच्या निमित्ताने पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्त्व आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. जैवविविधतेचा वारसा जपणारा पश्चिम घाट, युनेस्कोने नैसर्गिक वारसास्थळ घोषित केलेले कास पठार, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान ही सह्याद्रीतील संपन्नता अनुभवली पाहिजे आणि जपलीही पाहिजे.
पश्चिम घाटः जैवविविधतेचा अनमोल वारसा
हिमालयापेक्षाही प्राचीन मानली जाणारी पश्चिम घाटाची पर्वतरांग ही भारताच्या नैसर्गिक वारशातील एक अत्यंत महत्त्वाची परिसंस्था आहे. या पर्वतरांगेचा भारतीय मान्सूनवर प्रभाव पडतो. येथील घनदाट जंगले, उंच पर्वतरांगा, दऱया, नद्या आणि विविध प्रकारच्या अधिवासांमुळे या प्रदेशात विलक्षण जैवविविधता आढळते. पश्चिम घाटाला 2012 मध्ये युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. जगातील आठ प्रमुख जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी हा एक महत्त्वाचा प्रदेश आहे. येथे आढळणाऱया अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजाती स्थानिक आहेत, म्हणजेच त्या जगात इतरत्र नैसर्गिकरीत्या आढळत नाहीत.
युनेस्कोच्या माहितीनुसार, पश्चिम घाटात वनस्पती, सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या पश्चिम घाटामध्ये IUCN च्या रेड लिस्टनुसार जागतिक स्तरावर संकटग्रस्त असलेल्या किमान 325 प्रजाती आढळतात. यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या एकूण 229 वनस्पती प्रजाती, 31 सस्तन प्राणी प्रजाती, 15 पक्षी प्रजाती, 43 उभयचर प्रजाती, 5 सरपटणाऱया प्रजाती आणि 1 मत्स्य प्रजातीचा समावेश आहे. पश्चिम घाटातील या 325 संकटग्रस्त प्रजातींपैकी 129 प्रजाती असुरक्षित (Vulnerable), 145 प्रजाती संकटग्रस्त (Endangered) आणि 51 प्रजाती अतिगंभीर संकटग्रस्त (Critically Endangered) म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत.
पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे केवळ वन्य जिवांचे संरक्षण नव्हे, तर पाण्याचे स्रोत, नद्यांचे प्रवाह, मृदासंवर्धन, हवामानाचे संतुलन आणि लाखो लोकांच्या जीवनाशी निगडित नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होय. महाराष्ट्राच्या वन्यजीव संवर्धनाचा महत्त्वाचा आधार महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम घाटात वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील महत्त्वाच्या संरक्षित वनक्षेत्रांपैकी एक आहे. 2010 मध्ये स्थापन झालेल्या या व्याघ्र प्रकल्पामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो. या व्याघ्र प्रकल्पात घनदाट जंगले, डोंगररांगा, खोल दऱया, खडकाळ पठारे, गवताळ प्रदेश आणि जलस्रोत अशा विविध अधिवासांचा समावेश आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिह्यातील हा परिसर पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय सलगतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील भागातील वाघांच्या संवर्धनासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे विशेष महत्त्व आहे.
कोयना वन्यजीव अभयारण्य
कोयना वन्यजीव अभयारण्य हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. विस्तीर्ण वनक्षेत्र, डोंगराळ भूप्रदेश आणि समृद्ध जैवविविधता यांमुळे या अभयारण्याला विशेष पर्यावरणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कोयना परिसरातील जंगले जलसंधारण, मृदासंवर्धन आणि जलस्रोतांच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. या अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यजीव आणि पक्षी आढळतात. त्यामुळे कोयना अभयारण्याचे संरक्षण हे वन्यजीव संवर्धनाबरोबरच परिसरातील पर्यावरणीय सुरक्षिततेसाठीही आवश्यक आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यान
चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे दुसरे महत्त्वाचे अंग आहे. येथील निमसदाहरित वने, पानझडी वने, गवताळ प्रदेश, डोंगरदऱया आणि जलस्रोत विविध वन्य जिवांना अनुकूल अधिवास उपलब्ध करून देतात. या परिसरात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, रानकुत्रा, शेकरू आणि इतर अनेक वन्यजीव आढळतात. विविध पक्षी, वनस्पती आणि लहान जीवसृष्टीमुळे चांदोलीचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते. कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान या दोन्ही संरक्षित क्षेत्रांमुळे सह्याद्रीतील मोठय़ा वनप्रदेशाचे संरक्षण शक्य झाले आहे.
सह्याद्रीचे महत्त्व केवळ वाघ किंवा बिबटय़ासारख्या मोठय़ा प्राण्यांपुरते मर्यादित नाही. असंख्य लहान जीव, कीटक, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती मिळून या परिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन टिकवून ठेवतात.
सह्याद्रीची पर्वतरांग हा आपल्याला लाभलेला अमूल्य नैसर्गिक वारसा आहे. कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि संपूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
(लेखक मानद वन्यजीव रक्षक आहेत.)

































































