पाऊलखुणा – कोणार्क मंदिराच्या कलाकारांचे गाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट, [email protected]

कोणार्कचे सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे ते त्याच्या अद्वितीय स्थापत्यासाठी. हे सूर्यमंदिर असून सूर्यदेव जणू एका मोठय़ा रथातून डौलात निघाले आहेत असे या मंदिराच्या स्थपतींना दाखवायचे होते आणि त्यात ही मंडळी पूर्णपणे यशस्वी झाली आहेत. हे मंदिर गंगवंशीय राजा नरसिंहदेव याने इ.स. 1278 साली बांधले. त्यासाठी 1200 कारागीर सलग 16 वर्षे खपत होते. राजाने 36 कोटी रुपये हे आपले 12 वर्षांचे उत्पन्न या मंदिर निर्मितीसाठी खर्च केले, परंतु ‘मादला पांजी’ या जगन्नाथपुरीच्या भूर्जपत्रावर असलेल्या नोंदीनुसार इ.स.च्या नवव्या शतकात पुरंदर केसरी या राजाने कोणार्क देवासाठी म्हणजेच सूर्यासाठी हे मंदिर बांधले. पुढे नरसिंहदेवाने या केसरी राजवटीचा पराभव केला आणि आधीच्या मंदिरासमोर एक नवीन मंदिर उभे केले. आधीच्या मंदिरातली सूर्याची मूर्ती काढून ती आपण बांधलेल्या नवीन मंदिरात प्रस्थापित केली. अशाच आशयाची नोंद अकबराच्या दरबारातील अबुल फजल याने आपल्या ‘ऐने अकबरी’ या ग्रंथात केलेली आढळते.

कोणार्कपासून अगदी जवळ गोप या गावापाशी असलेल्या बयालीस बाटी या छोटय़ाशा गावाशी एक रंजक आख्यायिका जोडलेली आहे. या आख्यायिकेनुसार, कोणार्क सूर्यमंदिराचे प्रमुख वास्तुविशारद सिबेई सामंतराय महापात्र हे याच गावचे रहिवासी होते. कोणार्क मंदिराच्या बांधकामाचे नियोजन करण्यासाठी तब्बल 1200 कारागीर, अभियंते आणि पर्यवेक्षक याच परिसरात राहिले होते असे सांगितले जाते. तसेच कोणार्क मंदिरासाठी लागणारे मोठय़ा प्रमाणातील दगड व बांधकाम साहित्य जवळच्या पथराबुहा नदीतून लाकडी तराफ्यांद्वारे वाहून नेले जात होते, अशीही इथली मान्यता आहे.

या गावी असलेले गंगेश्वरी मंदिर तंत्र मार्गाशी निगडित आहे. भुवनेश्वरपासून 60 किलोमीटर, तर कोणार्कपासून जेमतेम 15 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. मंदिर साधारणपणे इ.स. 13व्या शतकात बांधले गेल्याचे सांगितले जाते. त्या काळातील स्थानिक राजघराण्याची कुलदेवता गंगेश्वरी देवी होती. गंगेश्वरी देवी मंदिर ओडिशाच्या पारंपरिक कलिंग स्थापत्य शैलीचे एक सुंदर उदाहरण आहे.  मंदिरावरील शिल्पांमध्ये चामुंडा, अष्टदिक्पाल, नायिका, विविध प्राणी, शिकारीची दृश्ये तसेच तत्कालीन सामाजिक जीवनाचे प्रसंग आढळतात. त्यापैकी विशेष उल्लेखनीय शिल्प म्हणजे चार हातांची वाराही. येथे ती पार्श्वदेवतेच्या स्वरूपात दाखवली असून तिची जीभ बाहेर आलेली आहे. मंदिराची रचना कलिंग स्थापत्य शैलीतील ‘पंचरथ’ प्रकारात करण्यात आली आहे.

गंगेश्वरी मंदिरालगत एक मोठे तळे आहे. हे तळे म्हणजे पूर्वीच्या पथराबुहा नदीचे पात्र असावे असे स्थानिक मंडळी सांगतात. कदाचित प्राचीन काळी या नदीने कोणार्कच्या भव्य सूर्यमंदिराच्या बांधकामासाठी एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग म्हणून काम केले असावे. या आख्यायिकेचा आणखी एक भाग असा सांगितला जातो की, कोणार्क मंदिराच्या बांधकामात सहभागी असलेले कारागीर येथे राहून आपल्या कामाचे नियोजन करत होतेच, पण गंगेश्वरी मंदिर हे स्वत कोणार्क सूर्यमंदिराचे एक प्रकारचे प्रारूप किंवा नमुना मंदिर आहे असेही सांगितले जाते. अर्थात या सगळ्या लोककथा. यांना श्रद्धा आणि समजुती याशिवाय दुसरा काही आधार नाही. तरीही या तळ्याकाठी उभे राहिले की, कोणार्कच्या मंदिर निर्मितीचा काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. सिबेई सामंतराय इथे उभे राहून सूर्यमंदिराच्या बांधकामाचा आढावा घेत असतील. योग्य त्या सूचना करत असतील. मंदिर पूर्ण झाल्यावर राजाला आमंत्रण दिले असेल. राजाची पालखी या सगळ्या हिरव्यागार वनराईतून मोठय़ा रुबाबात येत असेल.

अत्यंत शांत आणि रमणीय परिसरात  हे मंदिर आणि तिथला परिसर वसला आहे. प्राचीन कलिंग स्थापत्य, अप्रतिम शिल्पकला, तांत्रिक परंपरेचे जोडलेले संदर्भ आणि कोणार्कशी जोडलेल्या स्थानिक आख्यायिका यांमुळे गंगेश्वरी मंदिराला भेट देणे अनिवार्य आहे. नितांतसुंदर वातावरणात वसलेले हे सुंदर असे गंगेश्वरी मंदिर आणि त्यावरील वेगळी शिल्पकला आपली भटकंती समृद्ध करते.