
‘एसआययू’ने आरोग्य संवर्धन, त्वरित कृती, प्रशिक्षित प्रतिसादक, कार्यक्षम उपकरणे आणि विश्वासार्ह वैद्यकीय समन्वय यांवर आधारित सजग निर्णयांतूनच एका हृदयस्नेही विद्यापीठाची निर्मिती होते, असा संदेश दिला आहे. त्याचबरोबर ‘वर्षभर हृदयरोग रोखण्यासाठी सक्रिय व्हा’ आणि ‘एकही ठोका चुकता कामा नये’ यावर लक्ष केंद्रित केले आहे. या अभिनव उपक्रमाविषयी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मेडिकल अँड हेल्थ सायन्सेस विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर यांनी या लेखातून माहिती दिली आहे.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने आपल्या सर्व कॅम्पसमध्ये एकात्मिक कार्डियाक (हृदयस्नेही) आदर्श प्रतिकृतीचे अनावरण केले. आरोग्य व वैद्यकीय विज्ञान विद्याशाखा यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या या आदर्श प्रतिकृतीत हृदयरोगाशी संबंधित प्रतिबंध, आरोग्य संवर्धन, प्रारंभिक निदान, आपत्कालीन प्रतिसाद (ज्यात प्रशिक्षित प्रतिसादक, CPR आणि सर्व कॅम्पसवर बसवण्यात आलेल्या स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटरचा वापर समाविष्ट आहे, रुग्णालयीन संदर्भ सेवा, पुनरुज्जीवनोत्तर काळजी आणि सर्वसमावेशक पुनरुत्थान या घटकांनी युक्त अशा Unified Chainlink of Survival ` (जीवनरक्षक साखळी) प्रणालीवर आधारित आहे. या संपूर्ण व्यवस्थेचा केंद्रबिंदू सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आहे.
जागतिक हृदय दिनासाठी निर्धारित केलेली बहुवार्षिक संकल्पना ‘हृदयरोग रोखण्यासाठी सक्रिय व्हा’ (Use Heart for Action) अशी असून 2025-2026 या वर्षांतील मोहिमेचा मुख्य रोख ‘एकही ठोका चुकता कामा नये’ यावर केंद्रित केला आहे.
सिम्बायोसिस मॉडेल हे एकात्मिक ‘चेनलिंक ऑफ सर्व्हायव्हल’वर आधारित आहे. प्रारंभिक निदान आणि प्रतिबंधः कॅम्पसवरील आरोग्य सेवा केंद्र म्हणजेच Symbiosis Centre of Health Care (SCHC) च्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आणि संवर्धनात्मक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जातात. प्रशिक्षणाद्वारे सज्ज असलेले वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षित प्रथमोपचारक निर्धारित आपत्कालीन नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करतात. सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र (SUHRC) मध्ये तज्ञ आणि प्रगत वैद्यकीय सेवा उपलब्ध असून तिला प्रगत जीवनरक्षक प्रणालीने सज्ज अशा ‘स्मार्ट’ अॅम्ब्युलन्स आणि समन्वित संदर्भ सेवांचे भक्कम पाठबळ लाभले आहे.
संपूर्ण हृदयाच्या आरोग्यासाठी येथे एक समग्र दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. यामध्ये पौष्टिक अन्नाचे पर्याय निवडून ‘आहार साक्षरता’ (Nutritional Literacy) वाढवणे, शारीरिक सुदृढतेला (Physical Literacy) प्रोत्साहन देणे, सक्रिय जीवनशैली सुनिश्चित करणे आणि मानसिक स्वास्थ्याचे पावन मंदिर ठरलेल्या ‘माइंड स्टुडिओ’चा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम केवळ कॅम्पसपुरतेच मर्यादित नसून सिम्बायोसिसने आपल्या ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्वाचा’ (ISR) भाग म्हणून दत्तक घेतलेल्या 35 ग्रामीण व वंचित गावांमधील समाज घटकांपर्यंतही पोहोचवले आहेत.
संशोधन अभ्यासांतून असे स्पष्ट होते की, तरुणांमधील हृदयविकाराच्या जोखमीबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे, छातीत दुखणे, कारण नसताना धाप लागणे, धडधडणे किंवा अचानक चक्कर येणे यांसारख्या धोक्याच्या पूर्वलक्षणांचे वेळीच निदान करणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्या कुटुंबात अकाली हृदयविकार किंवा आकस्मिक मृत्यूचा इतिहास आहे, अशा व्यक्तींची आनुवंशिक चाचणीसह योग्य वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे.
आरोग्य सेवा, कॅम्पसचे कामकाज, शिक्षण, आपत्कालीन प्रतिसाद आणि सामाजिक संपर्क यांनी एकत्रितपणे काम करावे, अशी एक सर्वंकष विद्यापीठ-प्रणाली निर्माण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. हा दृष्टिकोन पद्धतशीरपणे दस्तऐवजीकरण (Documented) करण्यात आला असून ठरावीक कालावधीत मोजता येण्याजोग्या निर्देशकांच्या आधारे या प्रगतीचे व प्रभावाचे मूल्यांकन केले जाईल. उच्च शिक्षणाच्या इतर संस्थादेखील हृदयस्नेही शैक्षणिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी या प्रारूपाचा स्वीकार करू शकतात.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील आकस्मिक हृदयविकाराच्या मृत्यूचे मोजमाप करणारे आंतरराष्ट्रीय संशोधन अद्याप मर्यादित असले, तरी 12 ते 39 वर्षे वयोगटातील तरुणांवर पाच खंडांमध्ये केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्रति एक ााख व्यक्ती-वर्षांमागे 1 ते 2 आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पुरुषांमध्ये व वाढत्या वयानुसार याचे प्रमाण अधिक आढळले आहे.
18 ते 45 वर्षे वयोगटातील प्रौढांच्या अनपेक्षित मृत्यूंमध्ये हृदयविकार हा एक मुख्य कारणीभूत घटक आहे. तरुण भारतीयांमध्ये ‘सडन कार्डियाक डेथ’ ही एक वाढती आणि दुर्लक्षित आरोग्य समस्या आहे. मात्र, भारतात `SCD`साठी कोणतीही औपचारिक राष्ट्रीय नोंदणी प्रणाली नसल्यामुळे संपूर्ण देशभरातील नेमकी सांख्यिकीय आकडेवारी अद्याप दस्तऐवजीकरण केलेली नाही.































































