
>> वर्णिका काकडे
तेलंगणातील मराठी स्थलांतरितांची ही ‘आरे मराठी’ बोली. तामिळनाडूमधील तंजावर मराठी भाषिक समूहाप्रमाणे तेलंगणामध्ये आरे मराठी समूह आहे. महाराष्ट्रात 400-500 वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात अन्न-पाण्याकरिता गावेच्या गावे स्थलांतरित झाली. त्यापैकी तेलंगणात स्थायिक झालेले हे मराठी भाषिक. मुख्यत्वे वारंगल आणि करीमनगर भागात हा समाज आढळतो. येथील बहुतांश मराठी हे नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती अशा भागांतून स्थलांतरित झाले असावेत अशी इथे रुजलेल्या आरे मराठी या बोलीवरून वाटते.
या स्थलांतरित जाती-जमातींच्या संदर्भात स्वतची वैशिष्टय़पूर्ण बोली तेलंगणात आढळून येते. या बोलीवर अन्य बोलींचे संस्कारही दिसून येतात. यामुळेच स्थलपरत्वे बोलीची भिन्न रूपे आढळून येतात. विशेषत मराठवाडय़ाशी संबंधित सोयरसंबंध असलेल्या जमातींची बोली वेगळी दिसून येते.
आरे मराठी बोली असणारा हा समाज द्वैभाषिक आहे. प्रादेशिकता, अन्य बोलीचा संस्कार झालेली मराठी ही मुख्य भाषा तर तेलुगू ही स्थानिक व्यवहाराची भाषा आहे. यामुळेच मुख्य बोलीत शब्दांचे, लयीचे आदानप्रदान दिसून येते. प्रत्यक्ष बोलल्या जाणाऱया मराठीत अनेक शब्द अस्सल मराठी असले, तरी स्थानिक तेलगू भाषेचा प्रभाव आणि संकर त्यांच्या दैनंदिन शब्दसंग्रहावर दिसून येतो. घरात, वैयक्तिक संभाषणात आणि स्व-समाजात मराठीचा वापर होतो, तर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर विचार-विनिमय करताना तेलगू भाषा वापरली जाते.
प्रत्यक्ष भाषेमध्ये नातेवाचक शब्दांपैकी मराठी शब्द असले तरी काही शब्दांवर तेलुगू भाषिक उकार लागलेले दिसतात. जसे- आई, आज्जी, बापू, चुलतं, भावो/बावो, लेकुं असे शब्द बोलले जातात. तसेच संख्यावाचक शब्दांमध्ये केवळ एक ते दहा आणि शंभर इतकेच शब्द वापरले जातात. जसे- तीस ऐवजी तीन दहा, चोवीस ऐवजी दोन दहा नु चार असे शब्दप्रयोग केले जातात.
आरे-गोंधळी हे या समाजाचे पारंपरिक कथाकार म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहेत. वाल्मीकी आणि व्यास परंपरेतील रामायण व महाभारत या ग्रंथांमधील कथांबरोबरच लोकपरंपरेतील अनेक कथा हे गोंधळी समाजापर्यंत पोहोचवतात. आरे गोंधळी त्यांच्या लोकपरंपरेतील या प्राचीन कथांना आणि गीतांना आदराने ‘मऱहाट देसाच्या पुरान्या कथा’ असे म्हणतात, जे त्यांच्या सांस्कृतिक जिवंतपणाचे प्रतीक आहे.





























































