
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी गैरव्यवहारनंतर आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिरातील सर्व कर्मचाऱयांची 100 टक्के पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पडताळणीमध्ये पोलिसांकडून चारित्र प्रमाणपत्र आणि कौटुंबिक सर्व माहिती तपासली जाणार आहे.
ट्रस्टने कर्मचाऱयांची संपूर्ण माहिती मागवली असून त्यात त्यांच्या कुटुंबाची आणि नातेवाईकांची माहितीसुद्धा आहे. पोलिसांकडून मिळालेले चारित्र्य प्रमाणपत्र कर्मचाऱयांना सादर करावे लागणार आहे. राम मंदिरात कोटय़वधी रुपयांचा देणगी घोटाळा झाल्याने ट्रस्टने आता हा निर्णय घेतला आहे. देणगी घोटाळा प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून हे सर्व आरोपी सध्या कोठडीत असून त्यांच्याविरोधात 70 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. भविष्यात कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी ट्रस्टकडून ही खबरदारी घेतली जात आहे. मंदिराचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), निवृत्त एअरमार्शल जितेंद्र मिश्रा यांनी मागील आठवडय़ात पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात कर्मचाऱयांच्या पडताळणीची मोहीम सुरू आहे.
































































