
दोन हजार रुपयांवरील यूपीआय पेमेंटवर 0.4 टक्के एमडीआर लागू करण्याच्या निर्णयाला गुजरातमधील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. शुक्रवारी व्यापाऱयांनी मोठ्या प्रमाणात ‘नो यूपीआय डे’ साजरा केला. यावेळी व्यापाऱयांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणाविरोधात क्यूआर कोडवर काळा कपडा टाकून निषेध नोंदवला. केंद्र सरकार येत्या 15 ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांवरील यूपीआय पेमेंटवर 0.4 टक्के एमडीआर शुल्क आकारणार आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरात शुक्रवारी निषेध नोंदवण्यात आला. गुजरातमधील व्यापाऱ्यांनी नो यूपीआय डेला भरभरून प्रतिसाद देत आपल्या दुकानामधील क्यूआर कोड मशीन, साऊंड बॉक्स आणि पेमेंट स्कॅनला काळ्या कपडय़ात गुंडाळून ठेवले. त्याऐवजी नो यूपीआय टुडे असे पोस्टर लावले. गुजरातमध्ये 800 हून अधिक व्यापारी संघटनांनी यात सहभाग घेतला. केंद्र सरकारने या मागणीकडे लक्ष द्यावे यासाठी गुजरातमधील व्यापाऱयांनी यूपीआयचा वापर दिवसभर टाळला होता.































































