पुर्णेकरांच्या हत्येने संतापाचा स्फोट; भयमुक्त ठाण्यासाठी 9 ऑक्टोबरला पोलीस आयुक्तालयावर मोर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येने ठाण्यात संतापाचा स्फोट झाला असून शहरात रोज पडणारे खून, फोफावलेली गुन्हेगारी, खंडणीखोर – ड्रग माफियांचे थैमान आणि राजकीय दहशतीविरोधात सर्वपक्षीयांनी रणशिंग फुंकले आहे. येत्या 9 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, आप आणि आरपीआयच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात हजारो ठाणेकर सहभागी होणार असून कायदा-सुव्यवस्थेच्या निघालेल्या धिंडवडय़ांचा सरकार आणि पोलिसांना जाब विचारला जाणार आहे.

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयातच गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली. ही हत्या शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचा नवरा राजेंद्र शिंदे यांच्या इशाऱयावरूनच करण्यात आल्याचा आरोप पुर्णेकर कुटुंबीयांनी केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. हे हत्याकांड घडवणाऱया पाचपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोघेजण अद्याप फरार आहेत. या राजकीय हत्येमुळे ठाण्यासह अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

ठाण्यात सुरू असलेल्या या गुंडाराजविरोधात सर्व पक्ष एकवटले असून आज टिपटॉप हॉटेलमध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, आप आणि आरपीआयच्या नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. ठाण्यात गेल्या महिनाभरात पाच हत्या झाल्या, नऊ महिन्यांत 56 खून झाले. आज एक  पुर्णेकर पडले… उद्या आमच्यातील कोण? असा संतप्त सवाल करत शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयावर हजारो ठाणेकरांसह भव्य मोर्चा काढण्याची घोषणाच या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या मोर्चात सामाजिक संस्था आणि इतर राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज प्रधान धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे आम आदमी पक्षाचे अमर आमटे, आरपीआयचे संदीप खांबे यांनीही यावेळी आपली मते मांडली. शिवसेना शहरप्रमुख अनिश गाढवे शिवसेना महिला आघाडी संघटक रेखा खोपकर, काँग्रेसचे किक्रांत चक्हाण यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री आहात ना, मग लपलात कुठे? – राजन विचारे

सुसंस्कृत ठाण्याची दुर्दशा झाली आहे. ड्रग घेणाऱयांनी आठवडय़ापूर्वी एका इन्स्पेक्टरची हत्या केली. ड्रग माफियांनी थैमान घातले आहे, गुंड मोकाट आहेत. ठाण्याचा बिहार झाला आहे, असा संताप शिवसेना नेते राजन विचारे यांनी व्यक्त केला. भाजपचे मंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी पुर्णेकर कुटुंबीयांना भेटून त्यांना धीर दिला. तुम्ही ठाण्याचे पालकमंत्री आहात ना? मग पुर्णेकरांची हत्या झाल्यानंतर लपलात कुठे? असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. पुर्णेकरांचा मुलगा मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदेचे नाव घेतो मग त्यांच्यावर एफआयआर का दाखल झाला नाही? असा सवालही त्यांनी केला.

ठाण्यात 9 महिन्यात 56 खून – जितेंद्र आव्हाड

ठाण्यात नऊ महिन्यांत 56 खून पडले आहेत. आकडेच सत्य जगासमोर मांडत आहेत. ठाण्यासह अख्ख्या राज्यात कायदा-सुव्यवस्था कोसळली आहे. जनता भयभीत आहे. म्हणूनच भयमुक्त ठाण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बीडसारखा ठाण्यातही एक ‘आका’ – अविनाश जाधव

ठाण्यातही प्रत्येक गुन्हेगाराला वाचवणारा बीडसारखा एक ‘आका’ आहे. कारण आम्ही कुणाचाही खून पाडला तरी आम्हाला आमचा ‘आका’ वाचवेल याची खात्री गुंड आणि ड्रग माफियांना आहे. असे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.