महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला, पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्या वाट्याला; अमरावती शिंदे गट, छत्रपती संभाजीनगर अजितदादा गटाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीत पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांकडून दावा सांगितला जात असल्याने महायुतीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. महायुतीच्या जागावाटपात अखेर पुणे शिक्षकची जागा भाजपच्या वाटय़ाला आली आहे. याशिवाय पुणे व नागपूर पदवीधरची जागा भाजपला देण्यात आली आहे तर अमरावती शिंदे गट आणि छत्रपती संभाजीनगरची जागा अजितदादा गट लढविणार आहे.

विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागा परंपरेनुसार भाजपकडे आहेत असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अजित पवार गटाकडूनही पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी बैठकांचा धडाका सुरू होता. शिंदे गटाकडूनही या जागेसाठी मागील काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू होती. पण या सर्व घडामोडींनंतर आता तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर भाजप पुणे शिक्षकसह तीन जागा भाजप लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिंदेंना धक्का, चिवटेंचा पत्ता कट

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्यासाठी शिंदे गटाचे मंत्री व नेत्यांकडून मागील काही महिन्यांपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. उमेदवारी मिळाल्याच्या थाटातच चिवटे यांनी मतदारसंघात दौरे करून सभा घेण्यास सुरुवात केली होती. ही जागा भाजपकडे गेल्याने चिवटे यांचा पत्ता कट झाला असून शिंदेंसाठी हा एक धक्का असल्याचे बोलले जात आहे.