पालिका शाळेतील शिक्षकाला हायकोर्टाचा दिलासा नाहीच, कामावर पुन्हा नियुक्ती करण्याची मागणी फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थिनीचा विनयभंग तसेच तिला धमकावल्याप्रकरणी नोकरीवरून कमी केल्याने पुन्हा कामावर नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करत हायकोर्टात धाव घेणाऱया एका शिक्षकाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. याचिकाकर्त्या शिक्षकावरील गंभीर आरोप पाहता तसेच त्याची कोणतीही चौकशी न करताच कामावरून कमी करण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने कामावर पुन्हा नियुक्ती करण्याची संबंधित शिक्षकाची मागणी फेटाळून लावली आहे.

याचिकाकर्त्या शिक्षकाची कांजूरमार्ग येथील पालिकेच्या नेहरू नगर हिंदी माध्यमिक शाळेत 23 जून 2009 रोजी तिन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या सहा महिन्यांत प्रोबेशनवर असताना संबंधित शिक्षकाने सातवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग तसेच तिला धमकावल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेने कोणतीही चौकशी न करता कामावरून कमी केले म्हणून याचिकाकर्त्या शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकाकर्ता तसेच पालिकेचा युक्तिवाद ऐकून घेतला. याचिकाकर्त्याने याचिका दाखल करण्यास उशीर केल्याचे नमूद करत तसेच त्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने संबंधित याचिका फेटाळून लावली.