
बारागाव नांदूरसह इतर 15 गाव योजनेची पाणीपट्टी थकविणाऱ्या 15 गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. लोकनेते शिवाजीराजे गाडे-पाटील यांच्या प्रयत्नातून बारागाव नांदूरसह इतर 15 गाव योजना अस्तित्वात आलेली आहे. राज्यातील आदर्श प्रादेशिक पाणीपुरवठा योजना म्हणून बारागाव नांदूर योजनेचा नावलौकिक आहे. मात्र, शुद्ध पाणीपुरवठा करूनदेखील पाणीपट्टी भरण्यास ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाची चालढकल होत असल्याने योजना सुरळीत चालू ठेवण्यावर मर्यादा आल्या आहेत.
पाणी योजनेला महिन्याला एक कोटी 30 लाख रुपयांचे वीज बिल, कर्मचारी पगार, पाइपलाइन लिकेजेस, टीसीएल व इतर खर्चासाठी पैसे उपलब्ध करणे अवघड बनले आहे. बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द,तमनर आखाडा, देसवंडी, कोंढवड, शिलेगाव, केंदळ बुद्रुक, केंदळ खुर्द, चंडकापूर, पिंपरी, मांजरी, वळण, मानोरी, आरडगाव व तांदुळवाडीसह अनेक ग्रामपंचायतीकडे गेली सहा महिन्यांपासून पाणीपट्टीचे पैसे थकलेले आहेत.
पाणीपट्टी थकबाकी भरण्याबाबत अनेकदा कळवूनदेखील दाद दिली जात नाही. अखेर पाणीपट्टी न भरणाऱया ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नळ कनेक्शनधारकांनी आपली पाणीपट्टी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन भरावी व योजनेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापक शौकत इनामदार यांनी केले आहे.
योजनाच अडचणीत
– पाणी योजनेअंतर्गत सुमारे 1980 नळजोडण्या असून, प्रत्येक जोडणीसाठी 1800 रुपये नळपट्टी आकारली जाते. योजनेच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच वीज बिल, जलसंपदाची पाणीपट्टी आणि वेतन यासाठी मोठा खर्च होत आहे. योजनेचे वार्षिक वीज बिल एक कोटी रुपये आहे. महावितरणची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यातच नळपट्टीची अपेक्षित वसुली होत नसल्याने योजना आर्थिक अडचणीत सापडली आहे.

































































