तरुणाकडून चार लाख लुबाडून चार मुले असलेल्या महिलेशी लावले लग्न, मुंबईतील तरुणीसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नासाठी मुलीच्या शोधात असलेल्या राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील एका तरुणाची मुंबईतील एजंट महिलेच्या माध्यमातून चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीचे यापूर्वीच लग्न झाले असून, तिला चार मुले असल्याची माहिती समजताच नवरदेव व त्याच्या नातेवाईकांनी तरुणी आणि तिच्या काही साथीदारांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील संबंधित तरुण लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. त्याचदरम्यान त्याचा मुंबई येथील एका एजंट महिलेशी संपर्क झाला. या महिलेने मुंबईतील एका तरुणीशी त्याचे लग्न जमवून देते, असे सांगितले. त्यासाठी नवरदेव तरुणाकडून चार लाख रुपये घेऊन महिनाभरापूर्वी दोघांचा विवाह लावून देण्यात आला.

विवाहानंतर संबंधित तरुणी नवरदेवाच्या घरी आली. मात्र, महिनाभरात तिच्याबाबत वेगवेगळय़ा गोष्टी समोर आल्याने नवरदेवाच्या कुटुंबीयांना संशय आला. संबंधित तरुणीचे यापूर्वीच लग्न झाले असून, तिला चार मुले असल्याची समजली. तसेच तिच्या व्यसनांबाबतही माहिती मिळाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

आपल्याकडून चार लाख रुपये घेऊन लग्न जमवून देण्यात आले आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरदेव व त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान, एजंटने कबूल केलेली रक्कम संबंधित तरुणीला मिळाली नसल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी (दि. 2) दुपारी नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणी तसेच तिच्या काही साथीदारांना पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमागे मोठी टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. राहुरी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील नेमके आरोपी, फसवणुकीची पद्धत आणि आर्थिक व्यवहाराचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.