
कळंबोली परिसरात पाण्याची बोंबाबोंब सुरू असतानाच सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर थेट बांधकामाच्या साईटवर गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सिडकोचा पाणीपुरवठा विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून कळंबोलीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पाणीचोरीची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडकोच्या टाकीत पाणी भरून निघालेला टँकर नागरी वस्तीत जाण्याऐवजी थेट बिल्डरच्या साईटवर गेल्याचा प्रकार कळंबोलीतील समाजसेवक प्रशांत रणवरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या टँकरचा पाठलाग केला. या टँकरने सेक्टर १४ मधील बांधकाम साईटवर पाणी खाली केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर कळंबोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान टँकरचालकाने परस्पर हा प्रकार केला आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी स्पष्ट करून याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
कळंबोलीतील अनेक भागांत नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही भागांत ठराविक वेळेतही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सिडकोच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील टँकर बांधकामस्थळी पाणी देताना आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
पाणीटंचाईच्या काळात सिडकोच्या टँकरमधील पाणी बांधकामस्थळी कसे पोहोचले, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रशांत रणवरे यांनी केली आहे. तसेच टँकरच्या वापराची नोंद, पाणी वितरणाची परवानगी, संबंधित टँकरचा मार्ग आणि या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.






























































