ऐरोली-काटई पुलाचा गार्डर बसवण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्ग चार रात्री बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पांतर्गत ठाणे-बेलापूर मार्गावर पुलाचे गार्डर बसवण्याचे महत्त्वाचे काम एमएमआरडीएकडून हाती घेतले आहे. यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून उद्या आणि येत्या ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

गार्डर टाकण्याचे काम सुरू असताना या चार दिवसांच्या ठाणे- बेलापूर मार्गावर वाहने पार्किंग करण्यासही मनाई केली आहे.यातून एमएमआरडीएची वाहने वगळली आहेत. तर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिली.

बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सहाचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना दिघा येथील मुकुंद कंपनी येथून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित केला. तर चारचाकींना भारत बिजली चौकातून उजवीकडे वळून ऐरोली फायर ब्रिगेड चौकातून डाव्या बाजूने खेडेकर चौकमार्गे प्रवास करता येणार आहे.

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना रबाळे नाका सिग्नल येथून उजवीकडे वळून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनीमार्गे पुढे जाण्यासाठी मार्ग आहे. पटणीमार्गे जाणाऱ्या वाहनांसाठी रबाळे नाका-दिवागाव सर्कल-पटणी रोड मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.