ऑक्टोबर हिटचा झटका: ठाण्याचे नागपूर झाले; पारा 37 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर महिना उजाडताच उन्हाच्या प्रचंड झळा बसू लागल्या असून आज ठाण्याचे चक्क ‘नागपूर’ झाले. पारा ३७ अंश सेल्सिअसवर गेल्याने ठाणेकरांचा अक्षरशः घामटा निघाला. मध्यरात्रीही तापमान ३१ अंशांपर्यंत जात असल्याने एसी आणि गरागरा फिरणाऱ्या पंख्यांशिवाय ठाणेकरांना झोपही लागेनाशी झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच दोन दिवसांत ही परिस्थिती तर अख्खा महिना काढायचा कसा, याची चिंता त्यांना लागली आहे.

गेल्या आठवड्यात ठाणे शहराला पावसाने अक्षरशः धुतले होते. पण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांतच उष्णतेचा पारा उकळला आहे. दुपारच्या सुमारास कडक ऊन आणि हवेतील दमटपणा वाढल्याने ठाणेकरांचा घामटा निघू लागला आहे. आज कमाल तापमान ३० वरून थेट ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागपूरसारख्या झळा बसल्याने रस्तनावरील गर्दीही ओसरली होती. त्यातच हवामान विभागाने ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिल्याने अख्खा महिना उष्णतेने होरपळून काढणार की काय, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

प्रकल्पांच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल

विकासकामे आणि विविध प्रकल्पांच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल झाल्याने त्याचा परिणाम शहराच्या हवामानावर होत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. ऑक्टोबर हिटकडे केवळ काही दिवसांचे वाढलेले तापमान म्हणून पाहता येणार नाही, तर शहराची रचना, जमिनीचा वापर, वृक्षसंवर्धन, जलस्रोत आणि हरित क्षेत्राचे संरक्षण याबाबत प्रशासनाला ठोस विचार करावाच लागेल, असे मतही त्यांनी मांडले.