
मुंबईतील वाढत्या लोकसंख्या पाहता पोलीस बल कमीच पडत आहे, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण येत असून त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर व कुटुंबियांवर होत आहे. त्यामुळे पोलीस दलातील शिपाई वर्गाच्या कामाच्या तासांचा प्रश्न गांभिर्याने घेणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी X वरून केली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून X वर एक पोस्ट लिहली आहे त्यातून त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला.
2022 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अंमलदारांना देखील 8 तास ड्युटी व 16 तास आराम असा आदेश काढला होता. मात्र आता त्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच होताना दिसते. त्या आदेशाचे उदाहरण देते संजय राऊत यांनी पोलिसांच्या या समस्येवर माणुसकीने मार्ग काढणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अलीकडच्या वेगवान घडामोडींमुळे पोलिस दलातील शिपाई वर्गावर प्रचंड ताण आला आहे. याचा परिणाम त्यांचे कुटुंब तसेच प्रकृतीवर होताना दिसत आहे, यावर माणुसकीने मार्ग काढणे गरजेचे आहे,मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना , 04/05/2022 रोजी बृहन्मुंबई पोलीस दलातील पोलिसांना अपवादात्मक परिस्थिती वगळता 8 तास ड्युटी व 16 तास आराम असा स्थायी आदेश काढला होता. आज या आदेशाची अमलबजावणी फक्त कागदावरच होते. ज्यावेळी ड्युटीचा तक्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांना जातो त्यावेळी असे दाखवले जाते कि 8-8-8 तासांच्या तीन शिफ्ट मध्ये पोलीस काम करत आहेत. प्रत्यक्षात 12 तास किंवा त्यापेक्षाही जास्त तास पोलीस शिपायांच्याकडून काम करून घेतले जाते. हे सर्व वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने होत असते. अर्थात वरिष्ठांचा नाईलाज आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा स्फोट पाहता पोलीस बल कमीच पडत आहे, तरीही हा विषय गांभीर्याने घ्या”, असे संजय राऊत यांनी X वर म्हटले आहे.




























































