
दिल्लीहून आयझॉलला जाणाऱ्या विमानामध्ये हजारो फूट उंचीवर वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. हजारो फूट उंचीवर विमानातून प्रवास करणाऱ्या एका रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 40 टक्क्यांवर आली. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णाची अवस्था पाहून केबिन क्रू ने कुणी डॉक्टर आहे का अशी अनाऊंसमेंट केलीय अनाऊंसमेंट ऐकून तीन डॉक्टर तात्काळ देवदूत बनून धावले आणि रुग्णाला जीवदान दिले.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सदर रुग्ण मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. वैद्यकीय तपासणी आणि डायलिसिससाठी तो दिल्लीहून आयझॉलला प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी घसरली आणि त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. मात्र त्याच विमानातून प्रवास करणारे तीन डॉक्टर तात्काळ मदतीसाठी धावले आणि त्यांनी रुग्णाचे प्राण वाचवले. यामध्ये डॉ. विली लालहरुआितलुआंगा (जनरल सर्जन), डॉ. एफ रेमथांगपुई (बालरोगतज्ज्ञ) आणि डॉ. बेंजामिन खियांगते (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) यांचा समावेश होता.
डॉक्टरांनी विमानातील ऑक्सिजन मास्कद्वारे रुग्णाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला, तरीही ऑक्सिजनची पातळी 60 टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकली. रुग्णाची बिघडत चाललेली प्रकृती पाहता वैमानिकाने कोलकाता येथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी विमानातील वैद्यकीय किटमधून रुग्णाला स्टिरॉइड्स दिल्यानंतर ऑक्सिजन पातळी 90 टक्क्यांवर आली. यामुळे विमानाचा आयझॉलचा प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही वेळाने प्रवाशाची प्रकृती पुन्हा खालावल्याने डॉक्टरांनी ‘इंट्युबेशन’चा विचार केला. विमानात मर्यादित आपत्कालीन उपकरणे उपलब्ध असल्याने, विमान उतरताच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी ग्राउंड स्टाफशी समन्वय साधण्यात आला. मिझोरामच्या लेंगपुई विमानतळावर विमान उतरताच रुग्णाला त्वरित रुग्णवाहिकेत हलवण्यात आले. इंट्युबेशन सेट आणि एंडोट्रॅकिअल ट्यूब उपलब्ध असल्याने, डॉक्टरांनी इंट्युबेशनची प्रक्रिया पूर्ण केली आणि आपत्कालीन उपचार सुरू ठेवले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने आयझॉलमधील एलआरएम (LRM) रुग्णालयात आयसीयू कक्षात दाखल केले. आता रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
























































