बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे ‘बोल्ड स्ट्रोक्स शार्प ह्युमर’ बंगळुरू येथे विशेष प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, त्यांच्या निवडक व्यंगचित्रांचा आणि दुर्मीळ छायाचित्रांचा विशेष नजराणा बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्स येथे मांडण्यात आला आहे. ‘बोल्ड स्ट्रोक्स, शार्प ह्युमर’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात बाळासाहेबांची 100 व्यंगचित्रे आणि 20 छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. 3 ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन 19 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

यावेळी प्रदर्शनाचे क्युरेटर व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी उपस्थित रसिकांना गॅलरीची सफर घडवली. ही सफर घडवताना बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमागची कथा, त्यातील बारकावे आणि त्यांच्या कुंचल्याची खास शैली उलगडून सांगितली. सुमारे 20 ते 25 मिनिटांच्या या विशेष रसग्रहणातून बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन रसिकांना मिळाला.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांतील सूक्ष्म निरीक्षण, राजकीय-सामाजिक विषयांवरील भाष्य आणि मोजक्या रेषांमधून व्यक्त होणारा धारदार उपरोध यांचा या वेळी विशेष वेध घेण्यात आला. विशेष म्हणजे, या रसग्रहणानंतर उपस्थित काही व्यंगचित्रकारांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘आम्ही स्वतः व्यंगचित्रकार असूनही बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमधील हे बारकावे यापूर्वी आमच्या लक्षात आले नव्हते,’अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेची ताकद आणि त्यातील बारकावे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर आपल्या कुंचल्यातून सामाजिक आणि राजकीय वास्तवावर भाष्य करणारे प्रभावी व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रांतील सूक्ष्म निरीक्षण, उपरोध आणि मोजक्या रेषांमधून व्यक्त होणारा नेमका आशय याची प्रचिती या प्रदर्शनातून येत आहे. बंगळुरूमधील या प्रदर्शनाला व्यंगचित्रप्रेमी तसेच कलारसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.