
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानचा कबड्डी संघ जाहीर होताच महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात पेटलेली नाराजी अखेर राष्ट्रकुलच्या संभाव्य संघाच्या निवडीने काही प्रमाणात शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करूनही आशियाई संघातून डावललेल्या महाराष्ट्राच्या सहा खेळाडूंना आगामी राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ‘दुधाची तहान ताकावर’ अशीच या निवडीची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 21 ते 30 ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादच्या वीर सावरकर क्रीडा संकुलात ही पहिलीवहिली राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे.
अखिल हिंदुस्थानी कबड्डी महासंघाने (एकेएफआय) राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पुरुषांच्या संभाव्य संघात महाराष्ट्राच्या आदित्य शिंदे, शिवम पथारे, अजित पवार, अजित चौहान यांच्यासह रेल्वेकडून खेळणाऱया पंकज मोहिते आणि शुभम शिंदे यांना स्थान दिले आहे. विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानच्या पुरुष संघात महाराष्ट्राचा केवळ अस्लम इनामदार हा एकमेव खेळाडू होता.
हिंदुस्थानला डबल धमाक्याची संधी
पहिल्यावहिल्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 14 देश सहभागी होणार असून इराण, चिनी तैपेई आणि थायलंडसारखे बलाढय़ कबड्डी संघ राष्ट्रकूलचे सदस्य नसल्याने हिंदुस्थानचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेपाठोपाठ राष्ट्रकुलमध्येही ‘डबल धमाका’ करण्याची सुवर्णसंधी हिंदुस्थानला आहे.
महाराष्ट्राची ताकद वाढली
10 ऑक्टोबरपासून सराव शिबीर सुरू होणार असून अंतिम 14 जणांची निवड शिबिरातूनच होणार आहे. महाराष्ट्राचे किमान पाच खेळाडू अंतिम संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. महासंघाचे सचिव जितेंद्र ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिलांच्या संघात मात्र महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेले नाही.
हिंदुस्थानचा संभाव्य पुरुष संघ –
उजवा कोपरा – योगेश (हरयाणा), शुभम शिंदे (रेल्वे), डावा कोपरा – दीपक संकर (तामीळनाडू), नितेश कुमार (हरयाणा), उजवा कव्हर – दीपक (एसएससीबी), सुरजीत (हरयाणा), डावा कव्हर – परवेश (रेल्वे), अजित पवार (महाराष्ट्र), उजवा चढाईपटू -नवीन कुमार (एसएससीबा-), पंकज मोहिते (रेल्वे), सचिन (राजस्थान), राकेश (चंदिगड), डावा चढाईपटू – आदित्य शिंदे (महाराष्ट्र), भरत हुडा (एसएससीबी), अजित चौहान (महाराष्ट्र), शिवम पथारे (महाराष्ट्र),नीरज नरवाल (हरयाणा).
महिला संभाव्य संघ –
उजवा कव्हर- मुस्कान शर्मा (मध्य प्रदेश), सभाई गढवी (गुजरात), डावा कव्हर – प्रिया (उ.प्रदेश), डावा कोपरा – चंपा ठाकूर (हिमाचल प्रदेश), रिया कुमारी (बिहार), सुमन (रेल्वे), ज्योती (चंदिगड), उजवा कोपरा – रितू (रेल्वे), तम्मिना (हरयाणा), डावी चढाईपटू – पूजा नरवाल (रेल्वे), अनु (उत्तर प्रदेश), साक्षी (रेल्वे), उजवी चढाईपटू – कार्तिका रमेश (तामीळनाडू), अर्चना (कर्नाटक), रेणुका (राजस्थान), सिमरन पंबोज (पंजाब), निधी शर्मा (राजस्थान).

































































