
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांचा समावेश आहे. दुसरीकडे खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख आणि अनिता सगरे यांचे अर्ज वैध ठरल्याने दिलासा मिळाला आहे. आता बँकेच्या 21 जागांसाठी 295 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर आता माघारीच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
आमदार सुरेश खाडे यांनी सोसायटी गटाबरोबरच अनुसूचित जाती गटातून अर्ज दाखल केला होता. त्यांच्या सभासदत्वाच्या कालावधीसह अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर हरकत घेण्यात आली होती. सुनावणीनंतर दोन्ही अर्ज अवैध ठरल्याने खाडे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या मिरज सोसायटी गटातील अर्जावरही हरकत घेण्यात आली होती. हा अर्ज अवैध ठरला. मात्र, महिला राखीव तसेच नागरी बँका व पतसंस्था गटातील त्यांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांची उमेदवारी कायम आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे सुजय शिंदे यांनी हरकत घेतली होती. मात्र, ही हरकत फेटाळण्यात आल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला आहे.
खासदार विशाल पाटील यांच्या संचालकपदाच्या 10 वर्षांच्या कालावधीबाबत हरकत घेण्यात आली होती. तर आमदार सत्यजित देशमुख आणि अनिता सगरे यांच्यावर बँकेचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. संबंधित हरकतींमध्ये तथ्य आढळले नसल्याने तिघांचेही अर्ज वैध ठरले.
अर्ज अवैध ठरलेले उमेदवार
आमदार सुरेश खाडे, पूजा विशाल पाटील, शिल्पा शिवाजी पाटील, अर्जुन नेताजी कांबळे, महादेव रामांना अंकलगी, किसान गणपती जानकर, रामचंद्र सखाराम सरगर.
पडळकर विशाल पाटील यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार
आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे त्यांचा अर्ज पात्र केल्याने माजी आमदार विक्रम सावंत व सुजय शिंदे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दावा दाखल करणार असल्याचे सांगितले . खासदार विशाल पाटील यांचे 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांना उमेदवारी कायम राहिल्याने या विरोधात आमदार सुरेश खाडे कोल्हापूर सर्किट बेंच येथे दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

































































