
इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय तरुणाचे मोटारीतून अपहरण करून त्याला गोदामात डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर लोखंडी रॉड, केबल वायरने बेदम मारहाण करत विजेचे झटके देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बोरगाव ठाण्यात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला ताब्यात घेतले आहे. दिग्विजय दिनकर थोरात (वय 22, रा. नडशी, ता. कराड) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गणेश जयसिंग शिंदे, गणेश संतोष हादगे, बंटी ऊर्फ तेजस नीलेश साळुंखे, सनी ऊर्फ नीलेश रमेश नलवडे, गणेश नलवडे (सर्व रा. नागठाणे), जय पवार, महेश (पूर्ण नाव नाही) (सर्व रा. तारळे), शिवानी गणेश हादगे, श्रुती आणि इतर चार अनोळखी अशा एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी दिग्विजय याने एका संशयिताच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला होता. याचा राग मनात धरून संशयितांनी कट रचला. नुणे-चिंचणी रस्त्यावरून दिग्विजयचे हातपाय बांधून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. त्यानंतर नागठाणे येथील एका गोदामात डांबून ठेवून त्याला रॉड, काठी, पाइप आणि केबल वायरने अमानुष मारहाण करण्यात आली तसेच बॅटरीद्वारे विजेचे झटके देऊन हे प्रकरण मिटवण्यासाठी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवत बंटी ऊर्फ तेजस साळुंखेला ताब्यात घेतले आहे. उपअधीक्षक विपुल पाटील व सहायक निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. ई. पाटील तपास करत आहेत.

































































