
तरार्टचालकाचा ताबा सुटला आणि भरधाव थार घरात घुसल्याची धक्कादायक घटना वसईच्या जांभूळपाडा परिसरात घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन वाहनांचा चक्काचूर झाला असून भिंत कोसळून शेतकरी जखमी झाला. सुभाष सुतार असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
जांभूळपाडा येथील घर क्रमांक ४८/ब येथे सुभाष सुतार राहतात. त्यांच्या घरासमोरून भालिवली ते भाताणे जोडणारा सिमेंटचा रस्ता जातो. रविवारी रात्री भाताणेच्या दिशेने भालिवलीकडे भरधाव जाणाऱ्या महिंद्रा थारच्या तर्राट चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये घुसली. या धडकेत शेड तसेच त्यांच्या दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर थार घराच्या मुख्य दरवाजाला आणि भिंतीला धडकली. यात घराची भिंत सुभाष सुतार यांच्या अंगावर कोसळली.
































































