
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंचेकर टोळीचे ऑपरेटर असल्याचे म्हणणे शिंदे गटाच्या चांगलेच अंगलट आले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केली असून याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप व शिंदे गटात वाद विकोपाला गेला आहे. भाजपने शिंदे गटासोबतची पालिकेतील युती तोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण हे मंचेकर टोळीचे ऑपरेटर असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे भाजपचे पदाधिकारी संतापले आहेत.
उपमहापौर, सभापती पदांचे राजीनामे देणार
भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देऊन कमलेश निकम यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत शिंदे गटाने दगाफटका दिल्यानंतर लवकरच उपमहापौर आणि सभापती पदांचे राजीनामेही देणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

































































