
केंद्रातील मोदी सरकारने ऐन सणासुदीतही सर्वसामान्यांवर महागाईचा वरवंटा फिरवला आहे. महागाईने जनता आधीच पिचलेली असतानाच आता रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाने रेपो रेट 0.25 टक्के वाढवून सर्व सामान्यांचे बजेट पूर्णतः कोलमडून टाकले आहे. रेपो रेटच्या दरवाढीमुळे कर्ज महागले असून जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कमी कमाईत हप्ता कसा भरायचा आणि खायचे काय, या प्रश्नाने सर्वसामान्यांना घेरले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाविषयक समितीची तीन दिवसांच्या बैठकी नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये रेपो रेट 0.25 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. त्यामुळे महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला ऐन सणासुदीत मोठा धक्का बसला आहे. रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज महागणार असून याचा बोजा थेट कर्जधारकांवर पडणार आहे.
#WATCH | RBI hikes policy repo rate by 25 basis point to 5.5% https://t.co/92jeQuC3wz
— ANI (@ANI) October 7, 2026
आरबीआयने फेब्रुवारी 2025 नंतर रेपो रेटमध्ये कपात करण्याचे तर काही वेळा रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे धोरण राबवले आहे. परंतु आता महागाई वाढल्याने रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने त्याचा थेट परिणाम कर्जदारांवर होणार आहे. बँका व्याजदरात वाढ करतील. त्यामुळे कर्जदारांना जास्तीचा ईएमआय भरावा लागेल.
आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये 0.25 टक्के रेपो रेट वाढवला होता. 2023-24 मध्ये रेपो रेट कायम ठेवण्यात आला होता. फेब्रुवारी 2025 पासून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. परंतु आता रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली असून काही तज्ञांच्या मते डिसेंबरमध्येही रेपो रेटमध्ये 0.25 टक्के वाढ केली जाऊ शकते.



























































