हिंदुस्थानी वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ठेंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ न्यायाधीश आणि मानवी हक्क कार्यकर्त्या नवनेथेम ‘नवी’ पिल्लई (Navanethem ‘Navi’ Pillay) यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मानवी हक्कांचे संरक्षण, आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र नोबेल समितीने यंदाही त्यांना ठेंगा दाखवला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या काळात डरबन येथे हिंदुस्थानी तमिळ वंशाच्या कुटुंबात जन्मलेल्या पिल्लई यांनी वकील आणि न्यायाधीश म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयापासून ते रवांडा येथील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तपदापर्यंत त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

पिल्लई यांनी पॅलेस्टाईनमधील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. म्यानमारमधील सत्ताधाऱ्यांवर नरसंहाराचे आरोप असलेल्या प्रकरणात त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व, सामर्थ्यशाली देश आणि व्यक्तींना जबाबदार धरण्याची आवश्यकता तसेच पीडितांचे संरक्षण करण्याचे महत्त्व त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते, असे नोबेल समितीने नमूद केले. आंतरराष्ट्रीय कायदेशीर संस्थांची होत असलेली घसरण आणि कायद्याच्या राज्यव्यवस्थेपेक्षा सत्ताकारणाचा वाढता प्रभाव याबाबतही हा पुरस्कार इशारा देणारा ठरतो.

दरम्यान, 2025 मध्ये व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना, 2024 मध्ये जपानच्या निहोन हिडांक्यो आणि 2023 मध्ये इराणमधील महिलांच्या दडपशाहीविरोधात लढणाऱ्या नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.