मोदी-शहा जोडीच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही बसली आहे, सीजेपी आंदोलनावरून राज ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजीपीने दिल्लीत आंदोलन पुकारले होते. पण केंद्र सरकारने ठिकठिकाणाहून अभिजीत दिपकेंसह सर्व नेते आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी-शहा जोडीच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही बसली आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करून राज ठाकरे म्हणाले की, “No nation can be grateful at the cost of its liberty” हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत. हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे ! असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं, असेही राज ठाकरे म्हणाले.

आज आपण सत्तेत आहोत म्हणजे अनंत काळापर्यंत असू ही अपेक्षा बाळगू नका. तुम्ही काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही आहात. जेव्हा सत्तेतून एखादा हुकूमशाही मानसिकतेचा सत्ताधारी जातो त्यानंतर त्याची जनताच कशी पळताभुई करतात याची जगभरातील उदाहरणं आठवा. जगभरातील सोडा भारताचा इतिहास वाचलात तरी कळेल जिथे मुघलांपासून, पोर्तुगीजांपासून ते आमच्या साम्रज्यावरचा सूर्य मावळत नाही असा माज करणाऱ्या ब्रिटिशांचा जिथे या देशाने माज उतरवला, तिथे स्वकीयांचा माज इथली जनता उतरवणार नाही, असं वाटतंय का तुम्हा सत्ताधाऱ्यांना ? सरकार म्हणून तुमच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा आहे, ती नसेलच तर शिकून घ्या, आत्मसात करा. आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आणि तो अबाधितच राहिला पाहिजे हे निश्चित! असेही राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.