
कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली; मात्र बदलते हवामान, वाढती उष्णता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे साठवलेल्या कांद्याला काजळी लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे अधिक दराच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता कांदा खराब होण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला तुलनेने चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक दर मिळण्याच्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, साठवणुकीतील कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून खराब होण्याची चिन्हे दिसणारा कांदा तातडीने बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली आहे.
अधिक दराच्या अपेक्षा पोटी आता नुकसानीची धास्ती !
सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सुमारे चार हजार रुपये दर मिळत असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. भविष्यात आणखी चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.अधिक दराच्या प्रतीक्षेत राहिल्यास हातात आलेले उत्पन्नही कमी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
हवामानातील बदलाचा कांदा साठवणुकीला फटका
कांद्याच्या साठवणुकीसाठी योग्य वातावरण महत्त्वाचे असते. मात्र, सध्याच्या वाढत्या तापमानामुळे आणि हवामानातील बदलांमुळे चाळीत साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. कांद्याला काजळी लागणे, कांदा खराब होणे आणि विक्रीयोग्य मालाचे प्रमाण घटणे अशा समस्यांमुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
कवठे येमाईच्या रोहिलवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी विलासराव रोहिले यांनी सांगितले की, चाळीत साठवलेल्या कांद्याची नियमित पाहणी केली जात आहे. खराब होऊ लागलेला कांदा वेगळा काढून विक्रीसाठी पाठवला जात आहे. उष्णता वाढत असल्याने उर्वरित कांदाही खराब होण्यापूर्वी बाजारात पाठवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट
एकीकडे उत्पादन खर्च, मजुरी आणि साठवणुकीचा खर्च वाढत असताना दुसरीकडे कांदा खराब होण्याचा धोका शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अधिक दर मिळवण्याच्या आशेने साठवलेला कांदा वेळेआधी विकावा लागत असल्याने अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता कमी होत आहे.कांद्याला चांगला भाव मिळण्याची प्रतीक्षा करावी की नुकसान टाळण्यासाठी तातडीने विक्री करावी, अशा दुहेरी कात्रीत कांदा उत्पादक शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कांदा साठवणूक, योग्य प्रतवारी आणि वेळेवर विक्री यांचे महत्त्व पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे अधोरेखित झाले असल्याचे मत ही विलास राहिले यांनी व्यक्त केले आहे.





























































