
राजधानी दिल्लीत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजधानीत हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सीजेपीतर्फे करण्यात आले होते. दरम्यान, आंदोलनाला तीव्र रूप येण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई करत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना विमानातूनच ताब्यात घेतले.
एकीकडे सीजेपीच्या नेत्यांवर कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही प्रशासनाने कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी आजच्या या आंदोलनात सहभागी होणार होत्या आणि त्यादृष्टीने त्यांची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, त्या निवासस्थानाबाहेर पडताच दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफने त्यांना धडक कारवाई करत ताब्यात घेतले.
ममता बॅनर्जी यांच्यासह पक्षाचे माजी खासदार साकेत गोखले आणि तृणमूलचे अन्य पाच महत्त्वाचे नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. या कारवाईनंतर साकेत गोखले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ‘ममता दीदी तसेच माझ्यासह पाच जणांना दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफने ताब्यात घेतलं असून, आम्हाला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून अज्ञात स्थळी नेले जात आहे,’ असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. पोलिसांचे हे कृत्य म्हणजे लोकशाहीची सरळसरळ हत्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी सीजेपीच्या या आंदोलनात सहभागी होण्याचे आधीच संकेत दिले होते, ज्यामुळे तृणमूलच्या गोटात हालचालींना वेग आला होता.



























































