मला ताब्यात घेतले आहे, पण आंदोलन सुरूच राहणार; नेहा बोरा यांच्यासह अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) प्रस्तावित आंदोलनापूर्वी पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय, CJP चे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन अन्यत्र नेले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात CJP ने जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे.

‘मला ताब्यात घेतले आहे, पण आंदोलन सुरूच राहणार’

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरा यांनी, ‘मला ताब्यात घेतले आहे, पण आंदोलन सुरूच आहे,’ असे म्हटले. त्यांनी लोकांना सफदरजंग फ्लायओव्हर परिसरात पोहोचण्याचे आवाहन केले. पोलिसांनी एखाद्याला आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले, तर त्या व्यक्तीने त्याच ठिकाणी बसून आंदोलन सुरू ठेवावे आणि मागे हटू नये, असेही त्यांनी सांगितले.

श्री अरबिंदो मार्ग आणि सफदरजंग परिसरातून अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेखही नेहा बोरा यांनी केला. या परिसरात एका बसमध्ये अनेक सहकाऱ्यांना ताब्यात ठेवण्यात आले असून, त्या बसजवळ हजारो आंदोलक जमल्याचा दावा त्यांनी केला. ज्या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, त्याच ठिकाणी पोहोचून आंदोलन सुरू करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.