Nanded News – भाजपच्या सन्मान सोहळ्यात गोंधळात गोंधळ ! अंगणवाडी सेविकांच्या कार्यक्रमात साडी मिळवण्यासाठी महिलांची झटापट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< विजय जोशी

अंगणवाडी सेविकांचा सन्मान करायचा, त्यांच्या कार्याचा गौरव करायचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची; मात्र सन्मान सोहळ्यातच नियोजनाचा फज्जा उडाला. नांदेडच्या कुसुम सभागृहात आयोजित अंगणवाडी सेविका सन्मान कार्यक्रमात साड्यांच्या वाटपावरून निर्माण झालेल्या गोंधळाने आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महिला मोठ्या संख्येने उपस्थित, पण साड्यांची संख्या अपुरी! परिणामी, साड्या मिळवण्यासाठी महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

भाजपचे महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंगणवाडी सेविकांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात महिलांची मोठी उपस्थिती होती. मात्र, उपस्थित महिलांच्या तुलनेत साड्यांची संख्या कमी पडल्याने कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.

सन्मान सोहळा की नियोजनाचा बोजवारा?

अंगणवाडी सेविका या बालकांच्या संगोपनापासून ते शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जात असेल, तर त्यामागे योग्य नियोजन आणि प्रत्येक लाभार्थी महिलेचा सन्मान राखण्याची जबाबदारीही आयोजकांचीच असते. मात्र, साड्यांच्या वाटपासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने महिलांना गोंधळाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे.

या भव्य सोहळ्याला मा. मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण, मराठवाड्याचे प्रभारी सुनील राणे, खासदार डॉ. अजित गोपछडे, आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, मराठवाडा संयोजक नितीन काळे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख, महापौर कविताताई मुळे आणि भाजयुमोच्या युवती राज्य प्रमुख शांभवी साले यांची प्रमुख उपस्थिती होती.