
फ्लायदुबईच्या विमानात हिंदुस्थानी पायलट कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आणि विमान अपहरण किंवा अपघाताच्या प्रयत्नाप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) एफआयआर दाखल केला आहे. अपहरणविरोधी कायदा आणि यूएपीएच्या गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एनआयएच्या मते, या प्रकरणात आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक सुरक्षेचा समावेश असून, त्याचा परिणाम हिंदुस्थानी नागरिक आणि हिंदुस्थानी पायलटांवर होतो.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपहरणविरोधी कायदा, 2016 च्या कलम 3, यूएपीएच्या कलम 15(1)(अ) आणि यूएपीएच्या कलम 16 अंतर्गत एनआयएने 9 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
फ्लायदुबईचे FZ-1073 हे विमान 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7.05 वाजता दुबईहून निघाले. विमानात 174 प्रवासी आणि 6 कर्मचारी होते. हे विमान हिंदुस्थानी पायलट कॅप्टन स्मित मच्छार आणि एक ओमानी फर्स्ट ऑफिसर चालवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9.21 वाजता, जॉर्डन-सौदी अरेबिया सीमेजवळ, विमानाने अचानक खाली उतरण्यास सुरुवात केली आणि नंतर ते सौदी हवाई हद्दीकडे परत वळले.
प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, फर्स्ट ऑफिसरने विमान हायजॅक करण्याचा किंवा पाडण्याचा प्रयत्न करत असताना कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन मच्छार यांच्या डोक्याला आणि हातांना गंभीर जखमा झाल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



























































