
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून रायगड जिल्ह्याचा आज अक्षरशः विदर्भच झाला. पनवेलसह सर्वच तालुक्यात पाऱ्याने ३६ अंशांवर उसळी घेतली होती. त्यामुळे प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान प्रशासनाने जिल्ह्याला येलो अॅलर्ट केल्याने उष्णतेचा आणखीनच तडाखा बसण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानाने रायगडकरांची अक्षरशः दमछाक केली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते, तर दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका अधिकच असह्य होत आहे. तापमानातील वाढ आणि दमट हवामान यामुळे नागरिकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत. तापमानातील वाढत्या चढउतारांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येलो अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील तापमान
अलिबाग : ३४
पनवेल ३६
उरण ३४
कर्जत ३४
खालापूर ३६
सुधागड ३५
पेण ३६
मुरुड ३४
रोहा ३४
माणगाव ३६
म्हसळा ३४
तळा ३५
श्रीवर्धन ३३
महाड ३५
पोलादपूर ३४

























































