
देशाची राजधानी दिल्लीत आंदोलनाचा विषय निघाला की एकच ठिकाण डोळ्यासमोर येते, ते म्हणजे जंतरमंतर. मात्र, आता या ठिकाणी कोणतेही आंदोलन करता येणार नाही. आंदोलनाचे अधिकृत ठिकाण म्हणून जंतरमंतरला दिलेली मान्यता दिल्ली पोलिसांनी रद्द केली आहे. आंदोलने करण्यासाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी मैदान ही तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
जंतरमंतरवरील सुरक्षेची आणि वाहतुकीची काsंडी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. ही तीन ठिकाणे मध्य दिल्लीत असलेल्या जंतरमंतरपासून अनुक्रमे 3 किमी, 13.5 किमी आणि 44 किमी अंतरावर आहेत. या ठिकाणी आंदोलन करण्यासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल.
संपूर्ण देश जंतरमंतर बनेल
जंतरमंतरला आंदोलनाच्या अधिकृत ठिकाणांच्या यादीतून हटविल्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी संताप व्यक्त केला आहे. जंतरमंतर हे आंदोलनासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणून रद्द केले आहे. ते आता आंदोलनाचे ठिकाण राहिले नाही, कारण त्या भ्याड हुकूमशाहाने त्याचे युद्धभूमीत रूपांतर केले होते. आता संपूर्ण देश जंतरमंतर बनेल, असे दीपके म्हणाले.
निदर्शनांसाठी 24 तासांत परवानगी द्या, सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
जंतरमंतर येथे निदर्शने करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 24 तासांमध्ये परवानगी द्यावी, असा अल्टिमेटम कॉक्रोच जनता पार्टीने दिला आहे. परवानगी न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि प्रवत्ते सौरभ दास हे आज निदर्शने करण्याची परवानगी मागण्यासाठी संसद मार्ग पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, त्यांना परवानगी देण्यात आली नाही. याबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
























































