
छत्रपती शिवाजी महाराज पार्कात सोमवारी पुन्हा एकदा जेन झींचे वादळ पाहायला मिळाले. शिवसेना आणि मनसेने पुकारलेल्या मूक आंदोलन आणि स्वाक्षरी मोहिमेवेळी शिवाजी पार्कात जेन झींची मोठी गर्दी लोटली. रविवारी पोलिसांनी दंडुकेशाहीच्या बळावर जेन झींना अटकाव केला होता. मात्र सोमवारी स्थिती बदलली. हातात फलक घेऊन, घोषणा देत जेन झींनी भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवणाऱ्या मोदी सरकारचा निषेध केला.
हजारो शिवसैनिकांनी काळे कपडे परिधान करून तोंडाला, दंडाला काळी पट्टी बांधून मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. यात जेन-झीही सामील झाले. शिवसेना-मनसेचे बळ मिळाल्याने जेन झींचा तोच जोश आणि सरकारविरोधात तोच संताप पुन्हा पाहायला मिळाला.
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही तुम्ही तुमचे आंदोलन तुमच्या पद्धतीने करा, तुम्हाला कोणी हात लावणार नाही, असा विश्वास दिल्यानंतर जेन-झींचा हुरूप वाढला. रस्त्यावर ठिय्या देत मोदी, शहा, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘हमें चाहिए आझादी, मोदी-शहासे आझादी, देश बेचनेवाले बीजेपीसे आझादी….’ ‘व्होट चोर गद्दी छोड… हर हर घर जंतर मंतर…’, ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत झेन जींनी आपला रोष व्यक्त केला. संध्याकाळी चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत आंदोलकांनी आक्रोश केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मुंबई पोलिसांची आज मवाळ भूमिका
रविवारी सीजेपीचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारच्या इशाऱयावरून शिवाजी पार्क व दादर परिसराला मुंबई पोलिसांनी गराडा घातला होता. दिसेल त्याला उचला अशा भूमिकेत पोलीस दिसले. हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवल्याने शिवाजी पार्कला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलकांवर दडपशाही करणाऱया पोलिसांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सामोरे गेले होते. ही दडपशाही मुंबई-महाराष्ट्रात चालणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते. त्याचे परिणाम आज पाहायला मिळाले. आजही आंदोलन असताना तुरळक प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काल आक्रमक बाणा धारण केलेले पोलीस आज हाताची घडी घालून शांत उभे राहिलेले दिसले. ना कोणाला अडवले, ना कोणाची धरपकड केली.
निवडणूक आयोग जर एखाद्या राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी आज तरुणाईला रस्त्यावर उतरावे लागले आहे. – आलम, आंदोलक
सरकारने पोलिसी बळाचा वापर करून काल ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आज काळा मास्क घालून सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. – प्रथमेश गायकवाड, आंदोलक

























































