केडीएमसी कर्मचाऱ्यांना 27 हजारांचे सानुग्रह अनुदान द्या ! म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी प्रत्येकी 27 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी शिवसेना म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आले आहे.

यंदा 5 नोव्हेंबर 2026 पासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांना सणापूर्वी सानुग्रह अनुदान मिळावे, अशी भूमिका युनियनने मांडली आहे. महापालिकेतील सर्व कार्यरत कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रत्येकी 27 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दिवाळीच्या 10 ते 15 दिवस आधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष बाळ हरदास, सरचिटणीस सचिन बासरे, उपाध्यक्ष सुनील पवार, सुरेश तेलवणे, कार्याध्यक्ष अजय पवार यांनी केली आहे.

आशा सेविकांना 10 हजार

महापालिका हद्दीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांनाही दिवाळी भेट म्हणून 10 हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी युनियनने केली आहे. यंदा वाढती महागाई आणि सणासुदीचा खर्च लक्षात घेता प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.