
दिल्लीत सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जंतरमंतर मैदानांवर आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ”जंतरमंतर बंद करून सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलंय”, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
”कालच्या आंदोलनात जणू संपूर्ण देश उतरला असे दिसत होते. बॅऱिकेट्स लावले, रस्ते बंद केले, पोलिसांनी अडथळे आणले, पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तरी लाखो लोकं राहुल गांधींच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले होते. मोदी शहा यांनी जो प्रश्न विचारला होता की राहुल कौन है? कालचा मोर्चा बघितल्यानंतर त्यांना तो प्रश्न गिळावा लागला असेल, हा देश जागा झालाय आणि त्याला जागं करण्याचं काम राहुल गांधी करतायत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत”, असे संजय राऊत म्हणाले.
”आम्ही आंदोलन करू नये म्हणून सरकारने जंतरमंतरला टाळं लावलं आहे. ही भिती आहे. लोकशाहीचा आत्मा त्या जंतरमंतरवर होता. त्या लोकशाहीचा गळा घोटून आवाज बंद करण्याचं काम सरकारने केलं आहे. आता बुराडी, रामलीला अशा 20 किलोमीटर अंतरावरील मैदानांवर आंदोलन करायची त्याचा आवाज संसदेपर्यंत पोहोचणार नाहीत. मोदी शहा इतके भयभीत झाले आहेत की त्यांचे शरीर थरथरतेय व झोप उडतेय. काहीही झालं तरी लाखो लोकं रस्त्यावर उतरली, ती मोदींच्या घरासमोरही जाऊ शकली असती. एवढी उर्जा त्या गर्दीत होती. राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्ही मोदीच्या घरासमोरही आंदोलन केलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे जंतरमंतरवर बंदी घालून तुम्ही जनतेचा आवाज दाबू शकत नाही”, असेही संजय राऊत यांनी ठणकावले
पुढच्या सहा महिन्यात हुकुमशहांना दिल्लीतून गाशा गुंडाळावा
”आंदोलनावर हुकुमशहांनी बंदी घातली आहे का? ते त्यांनी सांगावं. आंदोलनावर लोकशाही प्रधान देशात बंदी आणता येणार नाही. जर अशी जबरदस्ती झाली तर मोदींना राजीनामा द्यावा लागेल. कालच्या आंदोलनावर पाच गुन्हे दाखल झाले ते काय कौतुक वाटतं का सरकारला? गुन्ह्याची भिती कुणाला दाखवताय? करा गुन्हे दाखल करा, अटक करा. तुमच्या जाण्याची वेळ आता आलेली आहे. पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला दिल्लीतून गाशा गुंडाळावा लागेल”, असेही संजय राऊत म्हणाले.





























































