
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या तिच्या एका गंभीर अपघातामुळे आणि त्यानंतर झालेल्या प्रकृतीच्या अपडेटमुळे चर्चेत आली आहे. बाली येथे एका वैयक्तिक कामानिमित्त गेलेली असताना तिचा एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची तीव्रता पाहता तिला तातडीने एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आले. मुंबईत दाखल झाल्यानंतर तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!”
या शेअर केलेल्या स्टोरीमध्ये नुसरतने तिच्या खोलीतून दिसणारा एक सुंदर सूर्यास्त आणि एक व्हिलचेअर शेअर केली आहे. या फोटोला तिने दिलेल्या एका भावूक कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने लिहिले आहे की, मला नेहमीच सूर्यास्त पाहण्याचं वेड होतं, पण आता माझा दृष्टिकोन बदलला आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।’ या आशयदायी ओळींवरून तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मकता स्पष्टपणे दिसून येते. अपघातानंतर तिची ही पहिलीच पोस्ट समोर आल्यामुळे तिचे चाहते आणि कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुसरत भरुच लवकरच अभिनेता टायगर श्रॉफसोबत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना पहिल्यांदाच नुसरत आणि टायगरची फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, चाहते तिच्या लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्याची वाट पाहत आहेत.


























































