सातारा जिल्ह्यातील सैदापूर पहिले ‘सायबर शिक्षित गाव’, 10 हजारांहून अधिक नागरिकांमध्ये जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या सायबर गुह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे सैदापूरला सातारा जिह्यातील पहिले ‘सायबरशिक्षित गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील क्विक हील सायबर वॉरियर क्लब आणि सैदापूर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 7 ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. या अभियानातून 10 हजार 31 नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती पोहोचविण्यात आली.

‘सायबर शिक्षित गाव, सायबर गुह्यांपासून दूर, आपले सैदापूर’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या मोहिमेत ऑनलाइन आर्थिक फसवणूक, ओटीपी व पासवर्डची सुरक्षितता, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर, डिजिटल व्यवहार आणि मोबाईलमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, स्थानिक गट आणि ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सैदापूर ग्रामपंचायत कार्यालयात 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात मोहिमेचा अहवाल सादर करण्यात आला. उपक्रमाची नोंद ग्रामपंचायतीत करण्यात आल्यानंतर सैदापूरला ‘सायबर शिक्षित गाव’ म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्पिरीट मीटरिंग टेक्नॉलॉजी कंपनीचे संस्थापक जॉन शेन यांच्या हस्ते समन्वयक डॉ. प्रियांका शिंदे आणि विद्यार्थी पदाधिकाऱयांना कृतज्ञतापत्र देण्यात आले.

यावेळी जॉन शेन यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सायबर सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न अनुकरणीय असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी काळभोर आणि माजी सरपंच जाधव यांनीही उपक्रमाचे स्वागत केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव वाघ यांनी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचे ज्ञान पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. समन्वयक डॉ. प्रियांका शिंदे यांनी विद्यार्थी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मोहीम यशस्वी झाल्याचे सांगितले. क्विक हील फाउंडेशनच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर, अजय शिर्के, गायत्री केसकर, दीपू सिंग, कार्तिकी यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांचे योगदान लाभले.