
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलनाचा भडका उडालाय. प्रत्येक तरुण या आंदोलनात सहभागी होत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लढतोय. मात्र दिल्ली पोलिसांकडून या आंदोलकांना अमाणूष वागणूक दिली जात आहे. पोलिसांनी महिला आंदोलकांना मारहाण करून त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. या दडपशाही सरकारविरोधात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. देशाचा एकच आवाज आणि एकच आंदोलन, या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दिल्लीत बुधवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांकडून मारहाण झालेल्या आंदोलकांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींना कॅमेऱ्यासमोर आणले आणि त्यांना आलेल्या अनुभवांबद्दलचे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या तरुणांना अक्षरश: लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याचे त्यांनी मांध्यमासमोर सांगितले. मात्र आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही आनंदाने सामोरे जाऊ आणि जोपर्यंत ज्ञानेश कुमारचा राजीनामा होत नाही तोपर्यंत लढत राहू, असा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी तरुणांना पाठिंबा देत आंदोलकांना मारहाण करणाऱ्या हुकूमशाही सरकारवर हल्लाबोल केला. आंदोलनात दिसणारी तरुणांची एकजूट म्हणजेच हिंदुस्थान आहे. यामध्ये ना कोणी हिंदू आहे, ना मुस्लिम आहे. यामध्ये कोणत्याही जातीची लोकं नाहीत. फक्त एकच आंदोलन आणि एकच आवाज आहे, तो म्हणजे आपल्या हिंदुस्थानचा आवाज. नरेंद्र मोदी या आवाजाच्या विरोधात उभे आहेत. पण माझा त्यांना एकच सल्ला आहे. या आवाजाच्या नादी लागू नका, यांच्यासमोर उभं राहण्याची कोणाचीही हिंमत नाही, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.
आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगितलं आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा व्हिडीओचा पुरावा ठेवा. आणि ते पुरावे आम्हाला पाठवा. यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण संपेल तेव्हा आम्ही संबंधित व्यक्तीला शिक्षा देऊ. नरेद्र मोदी, अमित शहा, ज्ञानेश कुमार आणि पोलीस अधिकारी ज्यांनी ज्यांनी विद्यार्थ्यांवर हात उगारला त्यांना शिक्षा होणार. तुम्ही पुरावे सोबत ठेवा. घाबरू नका, असा विश्वास राहुल गांधी यांनी आंदोलकांना दिला.
देशाचा एकच आवाज आणि एकच आंदोलन आहे. आणि या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.




























































