
भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जंतर मंतरवर तिरंगा फडकविला म्हणून सीजेपीच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यापाठोपाठ दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत अभिजीत दीपके यांना नोटीस बजावत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनास प्रतिबंध केला. पोलिसांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत मोदी-शहांच्या राजवटीत हिंदुस्थानात तिरंगा फडकविण्यास बंदी घातली गेल्याचा आरोप दीपके यांनी केला. दरम्यान पोलिसांचा जमावबंदी आदेश झुगारून हजारो नागरिक आज तिरंगा मार्चसाठी रस्त्यावर उतरले.
सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज तिरंगा मार्चची हाक देण्यात आली होती. त्यानुसार शेकडो तरुण सेंट्रल पार्कवर गोळा होऊ लागले होते. मात्र, मार्च सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी अभिजित दीपके आणि नेहा बोरा यांना ताब्यात घेण्यात आले. दीपके यांनी गुरुवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या एका टीमने दुपारी अभिजीत दीपके राष्ट्रवादीचे प्रवत्ते अनिस गवंडे यांच्या घरी दीपके थांबले होते त्या ठिकाणी जाऊन दीपके यांच्याशी अर्धा तास चर्चा केली आणि त्यांना एक नोटीस दिली. या नोटिशीत कॅनॉट प्लेसमध्ये कलम 163 लावण्यात आले आहे. तुम्ही तिरंगा रॅलीसाठी दिल्ली महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. तरीही तुम्ही सेंट्रल पार्कला आला तर बीएनएसएसच्या कलम 163 चं ते उल्लंघन ठरणार आहे. असं केल्यास तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं त्यात म्हटलं आहे. या नोटिशीवर सही केल्यानंतर दीपके यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘मी तिरंगा मार्चची हाक दिली होती. सात आठ दिल्ली पोलीस आले होते. तुम्ही तिरंगा फडकवण्यासाठी जाऊ शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं. आपल्या देशात तिरंगा फडकावण्यास मनाई केली जात आहे. मोदीजी, आम्ही आपल्या देशात तिरंगा फडकवू शकत नाही, असं काम तुम्ही केलंय.’ अशी टीका दीपके यांनी केली.
150 आंदोलक ताब्यात
दीपके आणि नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ‘आप’चेकार्यकर्ते रस्त्यावर उतरले. याशिवाय काँग्रेस आणि डाव्या विद्यार्थी संघटनांशी संलग्नित शेकडो विद्यार्थी सेंट्रल पार्कच्या दिशेने निघाले. जंतरमंतरच्या बाहेर देखील ‘आयसा’ विद्यार्थी संघटनेचे शेकडो विद्यार्थी गोळा झाले. मोदी सरकारची दडपशाही झुगारून तिरंगा मार्च काढण्यात आला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी 150 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतले होते. हे सरकार झुरळांना एवढे का घाबरत आहे, असा सवाल अभिजित दीपके यांनी केला.
सुनावणीस नकार
सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली महानगरपालिकेने कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने नकार दिला. प्रत्येकाला सद्बुद्धी लाभावी हीच आमची अपेक्षा आहे, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले.
दिल्ली पोलिसांची ‘एक्स’वर पोस्ट
सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर ‘भारतीय ध्वज संहिता’मधील 12 नियम पोस्ट करत नागरिकांना तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. राष्ट्रध्वजाला सर्वोच्च आदर मिळायला हवा आणि प्रत्येकाच्या वागण्यातून देशभक्ती दिसली पाहिजे. ‘तिरंग्याचा सन्मान करा आणि देशाचा गौरव कायम राखा,’ असा संदेशही दिल्ली पोलिसांनी दिला.
अभिजित दीपके, नेहा बोरासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक
तिरंगा मार्चला जाण्यापूर्वीच दिल्ली पोलीस अभिजित दीपके ज्या ठिकाणी मुक्कामी होते तेथे धडकले. त्यांनी दीपकेंना नोटीस दिली. त्यावर दीपके यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले की, आम्ही रॅली किंवा निदर्शने करणार नाही. केवळ तिरंगा फडकावणार आहोत. देशात तिरंगा फडकावणे गुन्हा आहे का? इंग्रजांचे पोलीस माझ्या घरी आले आहेत, असेच मला वाटत आहे. आपल्याच देशात आपलाच तिरंगा फडकावण्याचे स्वातंत्र्य नाही. त्यापेक्षा आम्हाला फासावर चढवा, अशा शब्दांमध्ये दीपके यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
धुव राठीला समन्स
यूटय़ूबर ध्रुव राठीला 8 वर्षांपूर्वीच्या व्हिडीओवरून मानहानीप्रकरणी साकेत कोर्टाने आज समन्स बजावले. गुरुग्राम येथील त्याच्या घराच्या मुख्य दारावर ही नोटीस लावली. भाजप आयटी सेलचे सदस्य विकास पांडे यांनी हा खटला दाखल केला असून उद्या सुनावणी होणार आहे.
मोदी इतके का घाबरलेत. तिरंगा फडकावणं हा गुन्हा आहे का? ही हुकूमशाहीच आहे. आम्ही आमच्या देशात तिरंगा फडकवायचा नाही तर पाकिस्तानात फडकवायचा का? ज्यांना हिंदुस्थानात तिरंग्याचं वावडं आहे त्यांनी पाकिस्तानात निघून जावं. – अरविंद केजरीवाल, आप


























































