मनुस्मृती हे जगातील पहिले संविधान! पोंक्षे यांचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या काळात युरोपातील देशांमध्ये लोक रानटी अवस्थेत वावरत होते, त्यांना कपडे कसे घालायचे याचीही अक्कल नव्हती, तेव्हा माझ्या ऋषितुल्य पूर्वजांनी जगातील पहिला संविधान ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ म्हणजेच ‘मनुस्मृती’ होय’, असे वादग्रस्त विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. भाजप सरकार, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली.

नागपुरातील राणी लक्ष्मीबाई दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेवर आयोजित व्याख्यानमालेत शरद पोंक्षे यांनी मनुस्मृतीचे गोडवे गायले. भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व विशद करताना पोंक्षे यांनी वेद, उपनिषदे, पुराणे, महाभारत आणि संस्कृत साहित्यामध्ये विज्ञानाचा मोठा ठेवा दडलेला आहे. ऋग्वेद हा जगातील पहिला ग्रंथ असल्याचा दावा केला.

इतिहासाची माहिती नसलेली भरकटलेली तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. या तरुणांनी सावरकरांचे साहित्य वाचलेले नाही. केवळ आम्ही म्हणतो म्हणून राजीनामा द्या, अशी मागणी केली जाते. आरोप सिद्ध न करता राजीनाम्याची मागणी केली जाते, अशी टीका पोंक्षे यांनी केली. स्वातंत्र्यानंतर भारताच्या शिक्षणव्यवस्थेची दिशा ठरवण्याचा अधिकार मुस्लिम केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आला. पहिले पाच केंद्रीय शिक्षणमंत्री मुस्लिम होते. मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण झाल्यानंतरही महात्मा गांधी यांच्यामुळे भारतात आठ टक्के मुस्लिम राहिले, असे विधान त्यांनी केले.