
एका हाताचा दमदार आधार, कमालीचा तोल आणि वर्षानुवर्षांच्या सरावातून साकारलेल्या कौशल्याची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’नेही दखल घेतली. सांताक्रुझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिर शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या मल्लखांबपटू अश्विन रावलने मल्लखांबावर ‘एकहाती दसरंग’ सादर करून नवा पराक्रम करत आपली नोंद ‘गिनीज बुका’त केली. त्याने एका मिनिटांत तेरा दसरंग करत हा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीने पारंपरिक हिंदुस्थानी मल्लखांब खेळाकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधले आहे.
अश्विनच्या मल्लखांब प्रवासाची सुरुवात चौथीत असताना झाली. प्रशिक्षक यशवंत साटम यांचा सराव पाहून त्याला या खेळाची गोडी लागली. पाचवीत असताना शाळेचे विश्वस्त लीलाधर हेगडे यांनी खेळात सहभागी होणाऱया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. त्यातून अश्विनला मल्लखांबाची वाट सापडली.


























































