कसालमध्ये 1 नोव्हेंबरला पहिले ‘घुंगुरकाठी’ साहित्य संमेलन; डॉ. महेश केळुसकर अध्यक्षस्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसाल येथे 1 नोक्हेंबरला जिल्हास्तरीय पहिले मराठी ‘घुंगुरकाठी’ साहित्य संमेलन रंगणार आहे. कसाल हायस्कूल येथे रविवार, 1 नोव्हेंबर रोजी जिह्यातील 50 साहित्यिक आणि कवी यांच्या उपस्थितीत संमेलन पार पडेल. सकाळी 10 वाजता ग्रंथपूजनाने उद्घाटन होईल. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर, उद्घाटकपदी रंगकर्मी, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांना निमंत्रित केले आहे. अध्यक्ष, उद्घाटकांपासून ते निवेदकापर्यंत सर्वजण सिंधुदुर्ग जिह्यातील असतील हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. सतीश लळीत म्हणाले की, या संमेलनात व्यासपीठावर फक्त जिह्यातील साहित्यिक, कवी, अभ्यासक, कलाकार यांचा वावर असणार आहे. संमेलन सर्व रसिकांना खुले आहे. दिवसभराच्या या संमेलनात उद्घाटनसत्र, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, काव्यरंग, खुले कवीसंमेलन आणि निमंत्रितांचे कवीसंमेलन अशी सात सत्रे असतील. स्वागताध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर यांची निवड करण्यात आली आहे.

कथाकथनाचे तिसरे सत्र लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. भोजनोत्तर चौथ्या सत्रात दशावतारातील भीष्माचार्य यशवंतकाका तेंडोलकर यांची प्रकट मुलाखत होईल. मालकणी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि ‘मराठी आठव दिवस’ उपक्रमाचे संकल्पक पत्रकार रजनीश राणे ही मुलाखत घेतील. ‘काव्यरंग’ या मालवणी कवितांच्या नाट्याविष्काराच्या पाचव्या सत्रात अभिनेते अभय खडपकर आणि नीलेश पवार, सिद्धी वरवडेकर हे डॉ. सई लळीत यांच्या दोन मालवणी कविता अभिनीत करतील.