भाईंदर पालिकेत भाजपची दादागिरी; नगरसेवकांनी पत्रकारांवर चप्पल भिरकावली, धक्काबुक्कीही केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपची दादागिरी दिसून आली. महासभेचे चित्रीकरण प्रेक्षक गॅलरीतील काही नागरिक करीत असल्याचे दिसून येताच भाजपच्या नगरसेवकांचा तिळपापड झाला आणि त्यांनी थेट धक्काबुक्की सुरू केली. तसेच शिवीगाळ करीत पत्रकारांच्या दिशेने चप्पलही फेकली. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करीत दादागिरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करा अशी मागणी केली.

विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी मीरा-भाईंदर महापालिकेची महासभा भरवण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रेक्षक गॅलरीतील काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमधून चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारचे चित्रीकरण करण्यास बंदी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरीही चित्रीकरण सुरू राहिल्याने प्रचंड गोंधळ उडाला आणि भाजपच्या नगरसेविका शानू गोहिल, हेतल परमार, प्रीती जैन, रूपाली शिंदे (मोदी), तरुण शर्मा, विशाल पाटील, नवीन सिंह यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी चित्रीकरण करणाऱ्यांना जाब विचारत धक्काबुक्की केली तसेच शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन; पोलीस, सुरक्षारक्षकांना बोलावले

चित्रीकरण होत असल्याची दखल महापौर डिंपल मेहता यांनी घेऊन सुरक्षारक्षक व पोलिसांना सभागृहात बोलावून संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले. त्यामुळे संतापाची ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की व मारहाणीत झाले. या धुमश्चक्रीमध्ये कृष्णा गुप्ता, करण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. या धक्काबुक्कीचे व मारहाणीचे वृत्तांकन करीत असलेल्या पत्रकारांनाही राड्याचा फटका बसला. मयूर ठाकूर, भाविक पाटील, जतीन दाधीच यांच्यासह काही पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्याचे चित्रीकरण करू लागल्याने सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणखी खवळले आणि महासभेतच पत्रकारांवर चप्पल फेकण्यात आली.